कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology
भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. आपल्याकडे अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यातीलच एक पीक म्हणजे कापूस. कापसाची शेती आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात हे नगदी पीक आहे. कापसाला पांढरे सोने देखील म्हणतात, हे देखील तुम्हाला माहीतच असेल.
या लेखात पाहूया कापूस लागवड कशी करावी व इतर तंत्रज्ञानाच्या वापर करून कापूस उत्पादनात भर कशी टाकावी?
हल्ली पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील कापूस लागवड करण्याचा कल जास्त दिसून येत आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहेत. तस तसे त्यांच्या गरजा देखील वाढत आहे आणि मानवाच्या मूलभूत गरजांमधील एक महत्त्वाची अशी गरज ती म्हणजे वस्त्र आणि हे वस्त्र निर्मिती करण्याचे काम कापसाद्वारेच होते. त्यामुळे कापसाची शेती किंवा कापसाचे पीक जगभरात तेवढेच महत्त्वाचे आहे. (कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
घटक | माहिती |
---|---|
पिकासाठी हवामान | कोरडे हवामान व तापमान 15-35°C , हवेतील आद्रता 75% पेक्षा कमी , दिवसा उष्ण आणि रात्री थंड हवामान. |
जमीनची निवड | काळी, मध्यम खोल, निचऱ्याची जमीन, सामू 6-8.5, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत टाळावी. |
पेरणीचे अंतर | सुधारित वाण 90×60 सेंटीमीटर , संकरित वाण 90×90 किंवा 90×120 cm |
पेरणीची योग्य वेळ | सोलापूर, सांगली, पुणे: मार्चचा पहिला पंधरवडा; खानदेश, विदर्भ, मराठवाडा: मेचा दुसरा पंधरवडा ,अहमदनगर – एप्रिलचा पहिला पंधरवडा. |
प्रमुख वाण | जेएलएच 168, फुले 688, एच 10, फुले 388, राशी 2, शक्ती 9, अंकुर 9, अजित 11, अजित 155, अजित 177, साई, जय. |
बीज प्रक्रिया | बुरशीनाशक, जिवाणू संवर्धक यांचा वापर , रोगांसाठी प्रतिबंधात्मक प्रक्रिया. |
पाणीपुरवठा | पेरणीनंतर कमी पाणी , फुलोरा व बोंड भरण्याच्या वेळी जास्त पाणी , ठिबक सिंचन तंत्राचा वापर, वेंचुरीद्वारे खते देणे. |
तण नियंत्रण | सुरुवातीच्या दोन महिन्यात तणमुक्त, तीन-चार कोळपण्या करणे , पेंडीमैथलीन तणनाशकाचा वापर पेरणीनंतर. |
किडींचे व्यवस्थापन | रस शोषणाऱ्या किडींसाठी कीटकनाशकांचा फवारणीद्वारे वापर. |
वेचणीची पद्धत | 40% बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी , नंतर 15-20 दिवसांनी वेचणी, स्वच्छता व योग्य साठवणूक करणे. |
हा तक्ता पाहून शेतकऱ्यांना कापसाच्या लागवडीतील महत्त्वाच्या मुद्द्यांची झटपट माहिती मिळू शकते.
सर्वात आधी पाहू कापसाला जमीन व हवामान कसे असावे लागते?
कापसाच्या पिकासाठी जास्त कालावधी लागतो. यासाठी उबदार व कोरडे हवामान गरजेचे असते. कापसाचे बी उगवण्यासाठी 18 ते 20 अंश सेल्सिअस तसेच जास्त वाढ जर हवी असेल तर 20 ते 27 अंश सेल्सिअस या तापमानाची गरज असते. कापसासाठी तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस व संपूर्ण हवेतील आद्रता 75% पेक्षा कमी असणे गरजेचे असते. दिवसा उष्ण व रात्री थंड अशा प्रकारच्या हवामानाची गरज कापूस या पिकाला असते. तरच कापसाची बोंडे चांगली भरतात व उमलतात. हे झाले हवामानाबाबतीत.
कापसाच्या पिकासाठी जमीन निवडताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे. कारण कापसाचे पीक जास्तीत जास्त सहा महिने तरी शेतात असते. म्हणूनच जमीन निवड योग्य असावी. कापसाच्या लागवडीसाठी काळी तसेच मध्यम व खोल 90 सेंटीमीटर आणि पाण्याचा चांगला निचरा होत असलेली जमीन निवडणे गरजेचे आहे. हलकी क्षारयुक्त किंवा पाणथळ, उथळ अशा जमिनीत कापसाची लागवड करू नये. त्याचप्रमाणे जमिनीचा सामू सहा ते 8.5 पर्यंत असणे देखील गरजेचे आहे.
कापसाचे उत्पादन घ्यायचे असेल तर सर्वप्रथम पेरणी करण्याच्या वेळी नांगरणी व्यवस्थित प्रकारे करावी. दोन-तीन वेळा तरी ढेकळे फोडून घ्यावीत. तसेच आधी घेतलेल्या एखाद्या पिकाचं धसकट, पाला, कचरा, सर्व गोळा करून तो जाळून घ्यावा. शेत संपूर्ण स्वच्छ करावे. यामुळे कीड व रोग नष्ट होतात. तसेच शेणखत, कंपोस्ट खत योग्य प्रमाणात मिसळावे. 90 सेंटीमीटर अशा अंतरावरती सऱ्या पाडण्यात याव्यात. या उथळ सऱ्यांमध्ये कापसाला व्यवस्थित प्रकारे पाणी देता येऊ शकते. त्यामुळे आपण पाण्याची बचत देखील करू शकतो. तसेच या खोल आणि रुंद सर्यांमुळे मुळे देखील वरच राहतील आणि या सरांची लांबी सहा ते आठ मीटर ठेवली जावी. (कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
पेरणीत किती अंतर ठेवावे?
जर कापसाचे बियाणे सुधारित असेल तर पेरणीचे अंतर 90*60 सेंटीमीटर असावे. जर संकरित वाण वापरणार असाल तर 90* 90 किंवा 90 * 120 सेंटीमीटर असावे. (कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
पेरणीसाठी कोणते वाण निवडावे?
कापूस उत्पादनात अजून सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पेरणी करताना कोणते बियाणे? कोणते वाण? आपण निवडणार आहोत. तसे सुधारित आणि संकरित असे वाण उपलब्ध आहे. त्यामुळे योग्य ते वाण निवडणे देखील गरजेचे आहे. बाजारात अनेक प्रकारची वाण उपलब्ध आहेत. जसे की जे एल एच168, फुले 688, एच 10, फुले 388, इत्यादी याव्यतिरिक्त अजूनही वेगवेगळ्या कंपनीच्या बीटी संकरित वाण उपलब्ध आहेत. जसे की राशी 2, शक्ती 9, अंकुर 9, अजित 11, अजित 155, अजित 177, साई, जय, वगैरे.. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही वाणाची निवड करावी. जर कोणी शिफारस केलेले असेल किंवा तुम्हाला एखादे चांगले वाण माहित असेल तर वरील दिलेल्या वाणाव्यतिरिक्त देखील तुम्ही ते वाण निवडू शकता. ज्याने तुमच्या उत्पादनक्षमतेमध्ये वाढ होईल.
बीज प्रक्रिया करणे
पिकांना रोगाचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी बियाणामध्ये बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जावी. त्यामुळे मोर, करपा, यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर जिवाणू संवर्धक व बुरशीनाशक याचा योग्य तो वापर करून बियाणांची लागवड करावी.(कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
कापसाच्या बियांची पेरणी कधी करावी?
पेरणी ही योग्य वेळी केली जावी. अन्यथा उशिरा पेरणी झाली तर पाऊस आल्यामुळे नुकसान उद्भवू शकते. तसेच किडी व रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो आणि त्यामुळे उत्पादन कमी होते. त्यामुळे सोलापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांनी मार्चच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पेरणी करावी. तसेच खानदेश, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेच्या दुसऱ्या पंधरवड्याप्रमाणे पेरणी केलेली फार चांगली. तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पेरणी करावी. पेरणी करण्याच्या वेळी सरीच्या मध्यावर दोन ते तीन इंचाचा खोल खड्डा करणे गरजेचे आहे आणि त्यात दिल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया सर्वकाही टाकून तो खड्डा पूर्णपणे मातीने झाकून टाकावा व लगेच त्याच पाणी दिले जावे. सरी पाडण्यापूर्वी शेणखत नसेल तर रासायनिक खत आणि शेणखत या दोन्हीचा वापर करावा. (कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
कापसाच्या पिकाला लागणारा पाणीपुरवठा
मार्च, एप्रिल महिन्यामध्ये जर पेरणी केली असेल तर कापसाच्या या पिकाला 800 ते 900 मिलिमीटर पाणी लागते. कापसाच्या पेरणी पासून ते त्याला पाते लागेल तोपर्यंत कमीच पाणी लागते. यादरम्यान जास्त पाणी देऊ नये कारण जास्त पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होऊ शकते. खरी पाण्याची गरज जेव्हा पीक फुलोऱ्यामध्ये येते व बोंडे भरली जातात त्यावेळेला असते. म्हणूनच कापसाचे उगवणे, पाते लागणे, फुले उमलने, बोंडे धरणे, या सगळ्यात गरजेच्या अवस्था आहेत. या अवस्थांमध्ये जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे. तीन ते चार दिवसांनी पाणी दिले जावे. पावसाळा सुरू होऊन जोपर्यंत व्यवस्थित रित्या पाऊस पडत नाही. तसेच हवामान व जमिनीच्या सुपीकतेनुसार दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या जाव्यात. पावसाळ्यात पाऊस पाहून पाणी द्यावे. जर पाणीपुरवठा कमी असेल तर तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजेच ठिबक सिंचनाच्या वापरण्याने आपण पाण्याची बचतही करू शकतो. त्यामुळे शेताची पाहणी करून आराखड्यानुसार ठिबक सिंचन उभारून त्याचा वापर केला जावा. काही ठिकाणी तर खते देखील ठिबक सिंचनाद्वारे दिली जातात. त्यासाठी ठिबक सिंचनाला वेंचुरी म्हणजे ठिबक संचातील पाण्यामध्ये विद्राव्य खत सोडणारे असे साधन असणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून जर खते दिली जात असतील तर ही खते 100 दिवसापर्यंत विभागून देण्यात यावीत किंवा स्फुरद खत पेरणी बरोबर मातीमध्ये दिले तरी चालेल. पण जर कापूस लागवड केले असेल तर नत्र व पलाशयुक्त खते ठिबक सिंचन म्हणजेच वेंचुरी द्वारे देण्यात यावे.
तण नियंत्रण
पीक जेव्हा वाढीस लागते तेव्हा या सुरुवातीच्या काळामध्ये पिकामध्ये येणारी तणे नियंत्रित करणे गरजेचे असते. तसे नाही केले तर उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे पेरणीनंतर दोन महिन्यापर्यंत पीक तनमुक्त ठेवणे गरजेचे असते. म्हणूनच जमिनीत हवा खेळती राहणे व तन नियंत्रण करण्यासाठी कापसाचे पीक तीन आठवड्याचे असतानाच सुरुवात करावी व तशी कोळपणी करून घ्यावी. सहा आठवड्यानंतर पुन्हा एकदा कोळपणी करावी. मध्ये खुरपणी किंवा तीन-चार कोळपण्या केल्या तरी चालतील. तसेच पेंडीमैथलीन हे तणनाशक प्रमाणानुसार बियाणे उगवण्याच्या आधी वापरले जाऊ शकते.
किडींचे व्यवस्थापन
कापसाच्या पिकावर वेगवेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव लागू शकतो. तुडतुडे, फुल किडे, मावा, पांढरी माशी, इत्यादी त्यासाठी कीटकनाशकांचे प्रमाण प्रति दहा लिटर पाण्यामध्ये साध्या फवारणी यंत्राद्वारे त्यावरती मारावे. (कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
कापसाची वेचणी व कापूस साठवणे
कापसाची वेचणी 40% बोंडे फुटल्यानंतर केली जावी व त्यानंतर पुढची वेचणी 15 ते 20 दिवसांनी केली जावी. वेगवेगळ्या जातीच्या व वेचणीचा कापूस स्वतंत्र वेचला जावा व त्याची साठवण देखील वेगवेगळी करावी. तसेच कापूस वेचणी शक्यतो सकाळचीच करावी. म्हणजे थंड वातावरणात काडीकचरा कापसाच्या बोंडा सोबत चिकटून येत नाही. वेचणी करण्याच्या वेळी कवडी कापूस वेचावा आणि तीन-चार दिवसात तो सुकवून घ्यावा. त्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ रित्या साठवून ठेवावा.
तर अशा पद्धतीने कापसाची लागवड केली जावी व यामध्ये ठिबक सिंचन तसेच औषधे फवारणी यंत्र या तंत्रज्ञानाचा देखील वापर करून कापसाच्या पिकाचे उत्पादन वाढवावे. (कपाशी लागवड व तंत्रज्ञान Cotton cultivation and technology)
अधिक माहिती साठी आमच्या website ला भेट द्या.